राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पुढील काही दिवसही पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (IMD) 7 ते 11 जुलैदरम्यानचा हवामान अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7 जुलैचा अंदाज
या दिवशी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट परिसर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, वाशीम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर ठाणे, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, अमरावती, सातारा घाट परिसर आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
8 जुलैचा अंदाज
पालघर, नाशिक घाट परिसर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट परिसर, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट राहणार आहे. तर पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
9 जुलैचा अंदाज
रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
10 जुलैचा अंदाज
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट कायम राहणार असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
11 जुलैचा अंदाज
अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू राहणार आहे. या भागांतही मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढू शकतो.
नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला
हवामान विभागाने नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट होत असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा.