Monsoon Update : अखेर आता मान्सूनची प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनने तळकोकणात प्रवेश केला असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत मान्सूनची वाटचाल कशी राहणार याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील तब्बल २५ जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते, मान्सून तळकोकणातून सक्रिय झाला असून तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. ७ जूनपासून सुरू झालेली मान्सूनची वाटचाल ८ आणि ९ जूनदरम्यान आणखी वेग घेईल. १४ जूनपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भाग मान्सूनच्या प्रभावाखाली येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
डख यांनी सांगितले की, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, बीड, लातूर आणि धाराशिवसह मराठवाड्यातील अनेक भागांपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही मान्सूनची प्रगती होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये. शेतात पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. फक्त वरवरची ओल असल्यास पेरणी टाळावी, अन्यथा बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारतीय हवामान विभागानेही मान्सूनबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरी पुढील काही दिवसांत तो राज्यातील इतर भागांमध्ये वेगाने विस्तारेल. येत्या १५ जूनपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भाग मान्सूनमय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पाऊस लवकरच सर्वदूर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.