Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असताना आता हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे
हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील काही तासांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर केरळमध्ये प्रवेश केला आहे. यंदा मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा झाले असले तरी पावसाळ्याची अधिकृत सुरुवात झाल्याने बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण आहे. कमी पावसाच्या शक्यतेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोव्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील उष्णतेची तीव्रता कमी होऊन अनेक भागांना पावसाचा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.