राज्यातील शेतकरी आणि नागरिक सध्या मोसमी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा संथ गतीने होत असल्याने अनेक भागांमध्ये उकाडा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मान्सून कोकणातील हर्णे तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर परिसरात स्थिरावलेला आहे. मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप पूर्वमोसमी पावसाची सक्रियता दिसून आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठीची प्रतीक्षा कायम आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्ण व दमट वातावरण जाणवू शकते. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यभरात पावसाचा जोर वाढण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. सध्याच्या अंदाजानुसार, १८ जूननंतर मान्सून अधिक सक्रिय होऊन राज्यातील बहुतांश भागांत चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होणार आहे.