Maharashtra school update : राज्यातील शाळा सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…

Maharashtra school update : राज्यातील शाळा सुरू होण्याच्या तारखेबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा बदल केला आहे. यापूर्वी संपूर्ण राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विदर्भातील तीव्र उष्णतेमुळे आता त्या भागातील शाळा उशिराने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवीन निर्णयानुसार विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू होतील. तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासूनच सुरू राहतील.

या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रक जारी केले आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी मार्च महिन्यात उन्हाळी सुट्टी आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य मंडळाशी संलग्न शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

सुरुवातीच्या निर्णयात विदर्भातील शाळा १५ जूनपासून सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश देण्यात आले होते. १५ ते २९ जूनदरम्यान सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत शाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळेत वर्ग सुरू करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र विदर्भातील वाढते तापमान आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या निर्णयाला विरोध करण्यात आला. यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णयात बदल केला.

नवीन आदेशानुसार विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू होतील आणि २२ ते ३० जून या कालावधीत त्या सकाळच्या सत्रात भरतील. त्यानंतर १ जुलैपासून नियमित वेळापत्रकानुसार शाळा सुरू राहतील.

दरम्यान, राज्यातील इतर सर्व विभागांतील शाळा १५ जूनपासून नियमित वेळेत सुरू होतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment