पावसाळ्यात हवेत ओलावा वाढल्यामुळे घरामध्ये झुरळे, मुंग्या आणि इतर कीटकांची संख्या वाढते. विशेषतः किचनमध्ये अन्न आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे झुरळे सहजपणे तिथे वास्तव्य करतात. यामुळे अन्न दूषित होण्याचा तसेच आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढतो.
झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण केमिकलयुक्त स्प्रे वापरतात. मात्र, अशा उत्पादनांचा वारंवार वापर आरोग्यासाठी योग्य ठरत नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक वस्तूंच्या मदतीनेही झुरळांचा त्रास कमी करता येतो.
पावसाळ्यात झुरळे का वाढतात?
पावसाळ्यात नाल्यांमधून, भिंतींतील फटींमधून आणि ओलसर जागांमधून झुरळे घरात प्रवेश करतात. दमट वातावरण त्यांच्यासाठी पोषक असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. किचनमध्ये अन्नाचे कण आणि पाणी मिळत असल्याने ते सर्वाधिक तिथेच दिसून येतात.
झुरळांपासून बचावासाठी ५ प्रभावी घरगुती उपाय
१. पीठ आणि बोरिक पावडरचे मिश्रण
एका वाटीत पीठ घ्या. त्यामध्ये २ चमचे साखर, १ चमचा हळद आणि २ चमचे बोरिक पावडर मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट किचनच्या कोपऱ्यांमध्ये, स्लॅबच्या कडांवर, भिंतींच्या फटींमध्ये आणि झुरळे येणाऱ्या ठिकाणी लावा. या मिश्रणामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास मदत होते.
२. कडुनिंबाचा स्प्रे वापरा
कडुनिंबाचे तेल किंवा कडुनिंबाची पाने उकळून तयार केलेले पाणी स्प्रे बाटलीत भरून किचन आणि घरातील इतर भागांमध्ये फवारा. कडुनिंबाचा तीव्र वास आणि नैसर्गिक गुणधर्म झुरळे तसेच इतर कीटक दूर ठेवण्यास मदत करतात.
३. तमालपत्राचा उपयोग
काही तमालपत्रे बारीक करून गरम पाण्यात मिसळा. पाणी थंड झाल्यानंतर झुरळे जास्त दिसणाऱ्या ठिकाणी त्याचा स्प्रे करा. तमालपत्राचा सुगंध झुरळांना त्या जागेपासून दूर ठेवण्यास मदत करतो.
४. लवंग ठेवा
काही लवंगा हलक्या हाताने कुटून किचनच्या कोपऱ्यांमध्ये, कपाटाजवळ किंवा झुरळे येणाऱ्या ठिकाणी ठेवा. लवंगाचा तीव्र सुगंध झुरळांना सहन होत नसल्यामुळे ते त्या भागात येणे टाळतात.
५. स्वच्छता ठेवा
झुरळांपासून कायमचा बचाव करण्यासाठी घर आणि विशेषतः किचन स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्री सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका, अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवा, जमिनीवर अन्नाचे कण साचू देऊ नका आणि कचऱ्याची बादली नियमित रिकामी करून स्वच्छ ठेवा. या सवयींमुळे झुरळांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
महत्त्वाची सूचना
घरगुती उपाय केल्याने झुरळांचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, झुरळांचा प्रादुर्भाव खूपच जास्त असल्यास किंवा वारंवार होत असल्यास तज्ज्ञ पेस्ट कंट्रोल सेवा घेणे अधिक परिणामकारक ठरू शकते.