SBI Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) पुन्हा नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या निवृत्त बँक अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या State Bank of India ने तब्बल ८२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार असून शनिवार आणि रविवार अशी सलग दोन दिवसांची सुट्टीही मिळणार आहे.
या भरतीसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे अनुभवी आणि निवृत्त अधिकाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
एसबीआयने ‘कन्करेंट ऑडिटर’ पदासाठी ही भरती जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ११ जून २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या भरती मोहिमेत एकूण ८२१ पदे भरली जाणार आहेत. मात्र ही संधी केवळ एसबीआयमधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. फ्रेशर्स किंवा इतर बँकांचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार नाहीत.
बँकेच्या अटींनुसार अर्जदार अधिकारी हा एसबीआयमधून वयाची ६० वर्षे पूर्ण करून नियमित निवृत्त झालेला असावा. तसेच निवृत्तीच्या वेळी संबंधित अधिकाऱ्याचा ग्रेड MMGS-III, SMGS-IV/V किंवा TEGS-VI या श्रेणींमध्ये असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी उमेदवाराचे कमाल वय ६३ वर्षे निश्चित करण्यात आले असून निवड झाल्यानंतर वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत सेवा देता येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या निवृत्तीच्या ग्रेडनुसार मासिक मानधन दिले जाणार आहे. त्याची रचना पुढीलप्रमाणे असेल:
- MMGS-III : ४५,००० रुपये प्रतिमहिना
- SMGS-IV : ५०,००० रुपये प्रतिमहिना
- SMGS-V : ६५,००० रुपये प्रतिमहिना
- TEGS-VI : ८०,००० रुपये प्रतिमहिना
या पदावरील अधिकाऱ्यांना बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवणे, अंतर्गत तपासणी करणे आणि नियमांचे पालन होत आहे का याची तपासणी करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ मे २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२६ आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत करिअर पोर्टलला भेट द्यावी.
वेबसाईटवर जाऊन “Concurrent Auditor Recruitment” या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. तो पुढील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
एसबीआयने उमेदवारांना अंतिम सबमिट करण्यापूर्वी अर्जात तीन वेळा दुरुस्ती करण्याची सुविधा दिली आहे. मात्र त्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे.
स्टेट बँकेसोबत पुन्हा काम करण्याची आणि अनुभवाच्या जोरावर आकर्षक मानधन मिळवण्याची ही निवृत्त बँक अधिकाऱ्यांसाठी एक मोठी संधी मानली जात आहे.