Post Office Monthly Income Scheme : आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या लाइफस्टाईलमध्ये बचत करणे अनेकांसाठी आव्हानात्मक झाले आहे. वाढते खर्च, महागाई आणि अनियमित उत्पन्न यामुळे अनेक जण गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न हवे असेल तर पोस्ट ऑफिसच्या काही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. त्यापैकीच एक लोकप्रिय योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS).
या योजनेत एकदाच गुंतवणूक करून दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवता येते. विशेष म्हणजे, तुमची मूळ रक्कमही सुरक्षित राहते. त्यामुळे निवृत्त व्यक्ती, गृहिणी किंवा स्थिर मासिक उत्पन्नाची अपेक्षा असलेल्या लोकांसाठी ही योजना चांगला पर्याय मानली जाते.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमची मुदत ५ वर्षांची असते. या कालावधीत गुंतवणूकदाराला दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात पैसे मिळतात. तसेच, योजना पूर्ण झाल्यानंतर गुंतवलेली संपूर्ण रक्कम परत मिळते. गरज भासल्यास एका वर्षानंतर खाते बंद करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे, मात्र त्यावर काही अटी लागू होतात.
या योजनेत सिंगल अकाउंटमध्ये कमाल ९ लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. अल्पवयीन मुलांच्या नावानेही खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जर एखाद्या व्यक्तीने ९ लाख रुपये गुंतवले, तर सध्याच्या व्याजदरानुसार त्याला दर महिन्याला सुमारे ५,५५० रुपये मिळू शकतात. म्हणजेच वर्षभरात जवळपास ६६,६०० रुपयांचे उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे, तीन जणांनी मिळून जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला अंदाजे ९,२५० रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो.
या योजनेतील व्याजाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे नियमित उत्पन्नासोबतच सुरक्षित गुंतवणुकीचाही लाभ मिळतो. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करू इच्छिणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकते.