Philippines Earthquake video फिलिपिन्समध्ये सोमवारी (८ जून) सकाळी झालेल्या भीषण भूकंपाने संपूर्ण देश हादरून गेला. सकाळी सुमारे ७.३० वाजता मिंदानाओ बेट परिसरात ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेमुळे अनेक भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्याने हजारो विद्यार्थी त्या वेळी शाळांमध्ये उपस्थित होते.
दरम्यान, डाव्हाओ ऑक्सिडेंटल प्रांतातील मालिता येथील महायाहाय प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ध्वजवंदन सुरू असतानाच अचानक जमिनीला जोरदार हादरे बसू लागले. काही क्षणांतच विद्यार्थी घाबरून इकडे-तिकडे पळू लागले आणि परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
मात्र, अशा कठीण परिस्थितीत शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मोठे धाडस दाखवले. त्यांनी शांतपणे विद्यार्थ्यांना “डक, कव्हर अँड होल्ड” या भूकंप सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. शिक्षकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. शाळेत त्या वेळी १०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गंभीर दुखापतही टळली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शिक्षकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अनेकांनी या शिक्षकांना खरे हिरो म्हटले आहे.
दरम्यान, या भीषण भूकंपामुळे फिलिपिन्समध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक इमारती कोसळल्या असून काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू सारांगानी प्रदेशाच्या किनाऱ्यापासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे.
भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला होता. त्यानंतर किनारपट्टीवरील एका गावात सुमारे एक मीटर उंच लाट धडकली. तसेच काही भागांमध्ये भूस्खलनाच्या घटनाही घडल्या असून त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
या नैसर्गिक आपत्तीनंतर अनेक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक प्रभावित झाले आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन यूनिसेफने फिलिपिन्स सरकारला आपत्कालीन मदत जाहीर केली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.