Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम आता भारतीय सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. आठवड्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, 5 जून रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. मात्र आता भावात सातत्याने नरमाई दिसत आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.56 लाख रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरू शकते.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव, पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थिती तसेच व्याजदरांबाबतची अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,471.79 डॉलरवर व्यवहार करत आहे.
काही महिन्यांपूर्वी सोनं होतं विक्रमी महाग
याआधी सोन्याच्या किंमतींनी 2 लाख रुपयांचा टप्पाही पार केला होता. त्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी सोनं खरेदी करणे अवघड झाले होते. आता मात्र दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात पुन्हा खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
| शहर | 22 कॅरेट सोनं (₹) | 24 कॅरेट सोनं (₹) |
|---|---|---|
| दिल्ली | 1,43,240 | 1,56,250 |
| मुंबई | 1,43,090 | 1,56,100 |
| अहमदाबाद | 1,43,140 | 1,56,150 |
| चेन्नई | 1,44,790 | 1,57,960 |
| कोलकाता | 1,43,090 | 1,56,100 |
| हैदराबाद | 1,43,090 | 1,56,100 |
| जयपूर | 1,43,240 | 1,56,250 |
| भोपाळ | 1,43,140 | 1,56,150 |
| लखनऊ | 1,43,240 | 1,56,250 |
| चंदीगड | 1,43,240 | 1,56,250 |
आरबीआयच्या निर्णयांकडे बाजाराचे लक्ष
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या जून महिन्यातील बैठकीचे निर्णय आज जाहीर होणार आहेत. सध्या देशातील रेपो दर 5.25 टक्के आहे. एप्रिल महिन्यात आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता. त्यामुळे आजच्या घोषणेकडे गुंतवणूकदार आणि सराफा बाजाराचे विशेष लक्ष लागले आहे.
तसेच, आरबीआयने अलीकडेच 12 अब्ज डॉलर किमतीचे सोने विकल्याच्या चर्चांना फेटाळून लावत देशाकडे अजूनही 880.52 टन सोन्याचा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.
चांदीचे दरही घसरले
सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीतही घसरण सुरूच आहे. आज सकाळी चांदीचा दर प्रति किलो 2,79,900 रुपयांवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव 73.56 डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला.
यावर्षी जानेवारी महिन्यात चांदीने 4 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता. मात्र त्यानंतर दरात सातत्याने घसरण होत असून सध्या चांदीचे दर तीन लाख रुपयांच्या खालीच स्थिर आहेत.