Ladki Bahin Yojana Installment: राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर तब्बल ८० लाख महिलांना योजनेतून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये आता लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, काही पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांऐवजी थेट ६००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
६ हजार रुपये कसे मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. या प्रक्रियेसाठी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर ३० एप्रिल २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली.
दरम्यान, अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित राहिल्याने त्यांना फेब्रुवारी २०२६ पासून योजनेचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यांचे हप्ते थकले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थी महिलांना हे थकीत पैसे दोन टप्प्यांत जमा केले जाऊ शकतात.
- प्रथम फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये जमा होण्याची शक्यता
- त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यांचे आणखी ३ हजार रुपये खात्यात जमा होऊ शकतात
यामुळे काही महिलांना एकूण ६ हजार रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्ज बाद झाल्याच्या चर्चेवर मंत्री अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज कायमस्वरूपी बाद करण्यात आलेला नाही.
त्यांच्या माहितीनुसार, काही अर्जदार पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचे संबंधित विभागांकडून निदर्शनास आले आहे. यात वयोमर्यादा, उत्पन्न मर्यादा तसेच वाहन नोंदणी यांसारख्या बाबींचा समावेश आहे. काही महिलांच्या नावावर वाहन नोंद असल्याची माहिती आरटीओ विभागाकडून मिळाली आहे. तसेच काही लाभार्थी इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याची नोंदही संबंधित विभागांकडून करण्यात आली आहे.
याशिवाय, काही महिलांनी निश्चित मुदतीत e-KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
लाभ बंद झाल्यास काय करावे?
ज्या महिलांनी e-KYC पूर्ण केले आहे, त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही आणि तरीही त्यांचा लाभ थांबला असेल, अशा लाभार्थींनी तातडीने महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसह इतर योजनांचे लाभ देखील थांबले असतील तर संबंधित प्रकरणांची पुन्हा पडताळणी केली जाईल, अशी ग्वाही मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
सरकारची भूमिका काय?
राज्यातील कोणत्याही पात्र महिलेला अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग काम करत असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.