सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्य सरकारकडून ८,६६७ पदांसाठी जम्बो भरती जाहीर

Maharashtra Mega Bharti 2026 : महाराष्ट्र सरकारकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मृद व जलसंधारण विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. विभागातील तब्बल ८ हजार ६६७ पदांच्या भरतीला उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याचे जलसंधारण मंत्री Sanjay Rathod यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी विभागीय स्तरावर सातत्याने आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन भरती प्रक्रियेच्या प्रगतीचा आढावा घेतील. त्यामुळे भरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निर्णयामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात आहे. विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीसह कृषी अभियांत्रिकी पदांचाही समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ३१ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्या संरचनेनुसार राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालये कार्यरत करण्यात येणार आहेत. त्यामुळे विभागाची प्रशासकीय क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. इंजिनिअरिंग असोसिएशनमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी शेवटची जाहिरात २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली होती, तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी २०१७ नंतर एकदाही जाहिरात काढण्यात आलेली नाही. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली होती.

अनेक उमेदवारांनी या भरतीच्या अपेक्षेवर इतर नोकरीच्या संधींकडे दुर्लक्ष केले असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र आता सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची आणि मोठी संधी ठरणार आहे.

Leave a Comment