8th Pay Commission Salary Hike Update 2026: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली असून, कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारसमोर विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. पुण्यात ४ आणि ५ मे रोजी झालेल्या बैठकीत वेतनवाढ, भत्ते आणि जुनी पेन्शन योजना यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स आणि कर्मचारी संघटनांनी या बैठकीत सध्याची किमान बेसिक सॅलरी १८ हजार रुपयांवरून थेट ६५ हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. वाढत्या महागाईचा विचार करून कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक दिलासा मिळावा, अशी भूमिका संघटनांनी मांडली.
यासोबतच फिटमेंट फॅक्टरमध्येही मोठी वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या २.५७ असलेला फिटमेंट फॅक्टर ३.८ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.
कर्मचारी संघटनांनी घरभाडे भत्ता (HRA) वाढवण्याचाही मुद्दा उपस्थित केला आहे. सध्या मिळणारे १० टक्के, २० टक्के आणि ३० टक्के HRA अनुक्रमे १२ टक्के, २४ टक्के आणि ३६ टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महागाई भत्त्यात (DA) वाढ करून कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली.
आठव्या वेतन आयोगात ‘फॅमिली युनिट’ची मर्यादा ३ वरून ५ सदस्यांपर्यंत वाढवण्याची मागणी देखील कर्मचारी संघटनांनी केली आहे. यामुळे कुटुंबाच्या खर्चाचा अधिक वास्तववादी विचार होईल, असे संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. देशभरातील सुमारे ८५ लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. नोकरीदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणारी फॅमिली पेन्शन शेवटच्या पगाराच्या ५० टक्के ठेवावी, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.
आठव्या वेतन आयोगासंदर्भातील या मागण्यांवर केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे आता देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.