Railway Group D Recruitment 2026 : रेल्वेमध्ये 21,997 पदांसाठी भरती, 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

Railway Group D Recruitment 2026 : रेल्वेमध्ये 21,997 पदांसाठी भरती, 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी संवर्गातील एकूण 21,997 पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी उत्तीर्ण असलेले इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ www.rrbapply.gov.in वर जाऊन 31 जानेवारी 2026 ते 2 मार्च 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2026 असून, 5 मार्च ते 14 मार्च 2026 दरम्यान अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र, एकदा निवडलेला रेल्वे झोन बदलता येणार नाही, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.

रेल्वे भरती मंडळाने उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी आधार कार्ड अपडेट करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आधार कार्डवरील फोटो अद्ययावत असावा तसेच उमेदवाराचे नाव आणि जन्मतारीख 10वीच्या प्रमाणपत्रानुसार अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

या भरती प्रक्रियेत उमेदवाराला केवळ एकाच रेल्वे झोनसाठी अर्ज करता येणार आहे. जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त झोनसाठी अर्ज केला, तर त्याचा अर्ज सरळ बाद करण्यात येईल. मात्र, निवडलेल्या एकाच झोनमध्ये उपलब्ध असलेल्या एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी उमेदवाराने पदांचा पसंतीक्रम (Preference Order) द्यावा लागेल. यासाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

वयोमर्यादा पाहता, या भरतीसाठी 18 ते 33 वयोगटातील उमेदवार पात्र असतील. वयाची गणना 1 जानेवारी 2026 या तारखेप्रमाणे करण्यात येईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार सवलत देण्यात येणार आहे. OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू असेल. खुला प्रवर्ग आणि EWS उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 1993 ते 1 जानेवारी 2008 या कालावधीत झालेला असावा.

निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असणार आहे. उमेदवारांची निवड सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आणि त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) यांच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.

लेखी परीक्षेचे स्वरूप पाहता, परीक्षा 90 मिनिटांची असणार असून एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. सामान्य विज्ञान विषयावर 25 प्रश्न, गणित विषयावर 25 प्रश्न, बुद्धिमत्ता व तर्कशक्तीवर 30 प्रश्न तर सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवर 20 प्रश्न असतील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग लागू असणार असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.

किमान उत्तीर्ण टक्केवारी खुला प्रवर्ग आणि EWS उमेदवारांसाठी 40 टक्के ठेवण्यात आली आहे, तर OBC, SC आणि ST उमेदवारांसाठी किमान 30 टक्के गुण आवश्यक असतील.

शारीरिक चाचणीच्या अटी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळ्या असतील. पुरुष उमेदवारांना 35 किलो वजन उचलून 100 मीटर अंतर 2 मिनिटांत पार करावे लागेल तसेच 1000 मीटर धावणे 4 मिनिटे 15 सेकंदांत पूर्ण करावे लागेल. महिला उमेदवारांना 20 किलो वजन उचलून 100 मीटर अंतर 2 मिनिटांत पार करावे लागेल आणि 1000 मीटर धावणे 5 मिनिटे 40 सेकंदांत पूर्ण करावे लागेल.

वेतनश्रेणी बाबत सांगायचे झाल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना लेवल-1 पे स्केलनुसार दरमहा 18,000 रुपये मूळ वेतन मिळेल. याशिवाय महागाई भत्ता, प्रवास भत्ता व इतर शासकीय भत्ते लागू असतील.

अर्ज शुल्क जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये ठेवण्यात आले आहे. मात्र, परीक्षा दिल्यानंतर त्यांना 400 रुपये परत मिळतील. SC, ST, महिला आणि EBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये असून, परीक्षा दिल्यास पूर्ण 250 रुपये रिफंड केले जाणार आहेत.

ही भरती 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी असून इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave a Comment