नविन वेतन आयोगाचे पे–मॅट्रिक्स निश्चित; जाणून घ्या पगारातील वाढ!
नविन वेतन आयोगाचे पे–मॅट्रिक्स निश्चित होण्याच्या हालचाली सुरू असून, सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी मानली जात आहे. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही वेतनवाढ कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
सध्या उपलब्ध माहितीनुसार, दि. 01 जानेवारी 2026 पासून सुधारित वेतनसंरचना लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. या नविन वेतनरचनेनुसार कर्मचाऱ्यांना केवळ वाढीव पगारच नव्हे, तर वेतन फरक (Arrears) देखील मिळणार आहेत. त्यामुळे वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही मुख्यत्वे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सातव्या वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ झाली होती. आता आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होण्याची शक्यता असून, विविध तज्ज्ञांनी याबाबत वेगवेगळे अंदाज मांडले आहेत.
नेक्सडिग्मचे संचालक रामचंद्रन कृष्णमूर्ती यांच्या मते, नविन वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टरचा आकडा 1.9 ते 2.5 पट दरम्यान असू शकतो. तर एनसी–जेसीएमचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या मते फिटमेंट फॅक्टर हा 2.57 पट किंवा त्याहून अधिक असण्याची दाट शक्यता आहे.
याचबरोबर कर्मा ग्लोबल कन्सल्टिंग सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रतिक वैद्य यांच्या मते फिटमेंट फॅक्टरचा आकडा 1.83 ते 2.46 पट दरम्यान असू शकतो. विविध तज्ज्ञांच्या या मतांमधून फिटमेंट फॅक्टरबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत.
वरील सर्व आकडेवारी आणि अंदाजांचा विचार करता, आठव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या वेतन व पेन्शनमध्ये किमान 20 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येणार असले, तरी सध्याचे संकेत कर्मचारी वर्गासाठी आशादायक असल्याचे दिसून येत आहेत.