Vrial video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात, तर काही धक्कादायक वास्तव समोर आणतात. सध्या रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रीशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये एका विक्रेत्याने जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवून विक्रीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार पाहून प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर घडल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या ट्रेमधून काही वडे आणि पाव खाली पडल्याचे दिसत आहे. सामान्यतः असे पदार्थ बाजूला काढून टाकणे अपेक्षित असताना संबंधित विक्रेत्याने तेच वडे पुन्हा उचलून ट्रेमध्ये ठेवल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
हा संपूर्ण प्रकार स्थानकावर उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रवाशांमध्ये संताप
व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. काहींनी रेल्वे प्रशासनाने अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रेल्वे स्थानकांवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची नियमित तपासणी व्हावी, तसेच स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशीही मागणी होत आहे.
रेल्वे प्रशासनाची दखल
माहितीनुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संबंधित विक्रेत्याविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, अधिकृत स्तरावर अद्याप याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
रेल्वे प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ खरेदी करताना स्वच्छतेची काळजी घेणे आणि संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित प्रशासनाकडे तक्रार करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.