Viral Bakery Video : चहासोबत खुसखुशीत खारी किंवा टोस्ट खाण्याची मजा अनेकांना आवडते. सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या चहापर्यंत हे पदार्थ अनेक घरांमध्ये नियमित खाल्ले जातात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने खारी-टोस्ट तयार करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या व्हिडीओमध्ये एका बेकरीतील अत्यंत अस्वच्छ वातावरण दाखवण्यात आले असून, ते पाहून अनेकांनी अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बेकरीमध्ये खारी आणि टोस्ट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. सुरुवातीला मोठ्या मिक्सरमध्ये पीठ, रवा, तेल, मीठ आणि इतर साहित्य टाकून पिठाचा गोळा तयार केला जातो. त्यानंतर त्या पिठाला वेगवेगळे आकार देऊन ट्रेमध्ये ठेवले जाते आणि भट्टीमध्ये भाजण्यासाठी पाठवले जाते. शेवटी तयार झालेले खारी-टोस्ट पॅकिंगसाठी तयार केले जातात.
मात्र या प्रक्रियेदरम्यान दिसणारी अस्वच्छता अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडीओमध्ये काम करणारे कर्मचारी घामाने पूर्ण भिजलेले दिसतात. काहींनी हातमोजे, मास्क किंवा इतर सुरक्षात्मक साधनांचा वापर केलेला नसल्याचंही दिसून येतं. अनेक ठिकाणी पदार्थ थेट हातांनी हाताळले जात असल्यामुळे नेटकऱ्यांनी स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेक युजर्सनी कमेंट करत अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष वेधले आहे. काहींनी “खारी कमी आणि रिस्क जास्त” अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी अशा बेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सर्वच बेकऱ्या अशा पद्धतीने काम करतात असे नाही. अनेक ठिकाणी आधुनिक मशिन्स, स्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि सुरक्षित पॅकिंग यांचा वापर करून दर्जेदार पदार्थ तयार केले जातात. मात्र काही ठिकाणी अजूनही स्वच्छतेचे नियम गांभीर्याने घेतले जात नसल्याचे या व्हिडीओमधून समोर आले आहे.
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबत चर्चा रंगली आहे. खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनीही जागरूक राहण्याची गरज असल्याचे अनेकांचे मत आहे.