HSRP Deadline Extended : वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत परिवहन विभागाने पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यामुळे अद्याप HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या निर्णयानुसार आता वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी १ जुलै २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, या मुदतीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार असून १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
राज्यात सध्या HSRP नंबर प्लेट बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असली तरी अनेक वाहनधारकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, नोंदणीकृत २ लाख ८७ हजार ९९० वाहनांपैकी तब्बल ४७ हजारांहून अधिक वाहनांवर अद्याप HSRP प्लेट बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत सर्व वाहनांवर प्लेट बसविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.
HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागतो. यामध्ये वाहनाचा प्रकार, नोंदणी क्रमांक, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर अशी माहिती भरावी लागते. त्यानंतर जवळचे RTO केंद्र किंवा अधिकृत डीलर निवडून ऑनलाइन फी भरता येते. तसेच नंबर प्लेट बसवण्यासाठी वेळ देखील निश्चित करता येते.
दरम्यान, अनेक वाहनधारकांनी जिल्ह्यात HSRP बसविणाऱ्या अधिकृत केंद्रांची संख्या अपुरी असल्याची तक्रार केली आहे. काही ठिकाणी नंबर प्लेटच्या गुणवत्तेबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. साध्या धक्क्याने प्लेट तुटणे, रंग फिका पडणे किंवा अक्षरे काही दिवसांत अस्पष्ट होणे अशा तक्रारी समोर येत आहेत.
वाहन सुरक्षेच्या दृष्टीने HSRP नंबर प्लेट महत्त्वाची मानली जाते. या प्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असल्यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे शासनाने सर्व वाहनधारकांना मुदतीपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवण्याचे आवाहन केले आहे.