ladki bahin yojana installment : राज्यातील ‘लाडकी बहीण योजना’ ही महायुती सरकारची सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र फेब्रुवारीनंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले नव्हते. त्यामुळे लाखो महिला या पैशांची प्रतीक्षा करत होत्या.
अखेर सरकारकडून निधी वितरणाला सुरुवात करण्यात आली असून अनेक महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. त्यामुळे लाभार्थींना आपले बँक खाते तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून एकरकमी ३००० रुपये मिळतील, अशी चर्चा सुरू होती. अनेक महिलांना दुहेरी हप्ता मिळण्याची अपेक्षा होती. मात्र सध्या अनेकांच्या खात्यात फक्त १५०० रुपयेच जमा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उर्वरित रकमेबाबत महिलांमध्ये संभ्रम कायम आहे.
सरकारकडून योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी पडताळणी मोहीमही राबवण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन करून लाभ घेत असल्याचे आढळलेल्या काही महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे लाभार्थींची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय लाभार्थी महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. सुरुवातीला ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. नंतर ती वाढवून ३० एप्रिल २०२६ पर्यंत करण्यात आली. ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्ते अडचणीत येऊ शकतात.