Ajit Pawar Video : अजित पवार यांचा निधनपूर्वीचा शेवटचा व्हिडीओ समोर, पाहून डोळ्यांत पाणी येईल
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अजित पवार महाराष्ट्रातील जनतेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन
महाराष्ट्राचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांचं निधन झाल्याच्या घटनेवर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. खूप धक्कादायक अशी ही घटना आहे. त्यांच्या निधननंतर आता त्यांचा मृत्यूपूर्वी तयार करण्यात आलेला एक शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत अजित पवार नागरिकांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.
अजित पवार यांच्या अकाली निधनापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने जात असताना अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. घटनेच्या काही दिवसांपूर्वी मतदारांना आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. ज्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेला अजित पवारांनी मतदानासंदर्भात आवाहन केले होते.
लोकशाही मूल्यांवर दृढ विश्वास ठेवत शेवटच्या क्षणापर्यंत जनतेशी जोडून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित पवारांच्या कार्याची आणि विचारांची ही आठवण आहे. त्यांच्या या संदेशातून लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असा त्यांचा ठाम संदेश दिसून येतो. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसिद्धी पत्रक जारी करुन या व्हिडीओबाबत माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक २०२६ करीता मतदारांना उद्देशून संदेश देणारा व्हिडिओ शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी देवगिरी या शासकीय निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला आहे. सदर व्हिडिओ प्रिय मतदार बंधू भगिनींसाठी व प्रसार माध्यमांकरीता प्रसारित करण्यात येत आहे. सदर व्हिडिओ पूर्णतः ओरिजनल आहे”, असं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
अजित दादा व्हिडीओत नेमकं काय म्हणाले?
“नमस्कार बंधू-भगिनींनो, आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कुणाच्या हातात द्यायचा, हे ठरवण्याची ही महत्त्वाची वेळ आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची महत्त्वाची किल्ली आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार यासारख्या मुलभूत प्रश्नांशी थेट जोडलेली ही संस्था आहे”, असं अजित पवार व्हिडीओत सुरुवातीला बोलतात.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ते ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळलेला आहे. मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे. पाणीपुरवठा असो, रस्त्यांची कामे असोत, आरोग्य सुविधा असोत किंवा शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अर्थात AI, डिजीटल साधनं असोत, हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे”, असं अजित पवार व्हिडीओत बोलताना दिसतात.
“या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या. स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख कारभारासाठी आम्हाला संधी द्या. तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. हा माझा शब्द आहे. विकासाच्या या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा. येत्या 5 फेब्रुवारीला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा. मतरुपी तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या, असं आवाहन मी या निमित्ताने करतो. तुमचं एक मत गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गावाच्या समृद्धीसाठी आहे हेही लक्षात ठेवा. धन्यवाद ! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी”, अशी भूमिका अजित पवार यांनी व्हिडीओत मांडलेली बघायला मिळत आहे.