Gold Silver Price Today : सोनं 20 हजारांनी, तर चांदी तब्बल 1 लाख रुपयांनी स्वस्त

Gold Silver Price Today : सोनं 20 हजारांनी, तर चांदी तब्बल 1 लाख रुपयांनी स्वस्त

जागतिक बाजारात घडलेल्या घडामोडींचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी नवीन उमेदवाराचे नामांकन केल्यानंतर जागतिक स्तरावर कडक मौद्रिक धोरण राबवले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकी डॉलर मजबूत झाला असून, आधीच उच्चांकी पातळीवर असलेल्या सोनं आणि चांदीच्या किमतींवर मोठा दबाव आला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली जात आहे.

भारतातील MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम तब्बल 19 हजार रुपयांनी कमी होऊन 1,49,075 रुपये इतका झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली असून चांदीचा भाव प्रति किलो 98 हजार रुपयांनी उतरून 2,91,922 रुपये झाला आहे. गेल्या शुक्रवारपासून जागतिक बाजारात जोरदार नफावसुली सुरू असल्याने सोनं-चांदीच्या किमतींमध्ये सलग घसरण होत आहे.

सराफा बाजारातही या घसरणीचा मोठा परिणाम दिसून येत आहे. Goodreturns या संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, आज दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 9 हजार रुपयांनी कमी होऊन 1,60,730 रुपये इतका झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,47,350 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

चांदीच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात अवघ्या दोन दिवसांत चांदीचा भाव तब्बल 60 हजार रुपयांनी कमी झाला आहे. आज सकाळी चांदीचा दर प्रति किलो 3,50,000 रुपये इतका आहे. औद्योगिक वापर आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने चांदीला मागणी असली तरी सध्याच्या परिस्थितीत किंमतींवर दबाव कायम असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि जळगाव या शहरांमध्ये आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति तोळा 1,60,580 रुपये इतका आहे. दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,47,200 रुपये असून प्रति ग्रॅम दर सुमारे 14,720 रुपये आहे. राज्यभरात चांदीचा भाव आज प्रति किलो 3,50,000 रुपये इतका आहे.

दरम्यान, आगामी काळात सोनं आणि चांदीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. दागिने उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कात कपात जाहीर करू शकते, अशी शक्यता आहे. जर तसे झाले, तर देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींवर आणखी दबाव येऊ शकतो आणि सोनं-चांदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment